Ad will apear here
Next
गोष्ट एका सावलीची!


विख्यात लेखक, दुर्गप्रेमी गो. नी. दांडेकर यांच्यासोबत काही काळ आणि नंतर ५० वर्षांहून अधिक काळ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत सावलीसारखे असलेले त्यांचे स्वीय सहायक/सचिव प्रतापराव टिपरे यांचे २६ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले. टिपरेकाकांना शिवशाहीरांबरोबर राहून ५० वर्षे झाली, त्या वेळी मुंबईतील इतिहासप्रेमी लेखक चंदन विचारे यांनी टिपरेकाकांचा परिचय करून देणारा एक लेख लिहिला होता. तो लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.
....
‘सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना’ असं तुम्हा आम्हाला शाळेत शिकवलं जाई. शाळेतले शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर, वळणदार, सुवाच्य कसे असेल याकडे विशेष लक्ष देत असत. शाळेत असताना पत्रलेखन, निबंधलेखनाच्या आणि इतर निमित्ताने बरेच लिखाण होई. हल्ली मात्र मोबाइल, कम्प्युटरवरच लिखाण चालत असल्याने कागदावर लिखाणाची सवय थोडी मोडली गेली. मी बॅकअप म्हणून माझ्या कविता डायरीत लिहीत असतो; पण हल्ली स्वतःचे हस्ताक्षर पाहिलं, की पुन्हा शाळेत जाऊन बसावंसं वाटतं. हस्ताक्षरांचा विषय निघाला, की मला दोन माणसांची आवर्जून आठवण येते. नाही म्हणजे सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या व्यक्तींची यादी काढायची म्हटलं, तर बरीच नावं सापडतील; पण मी ज्या दोन नावांविषयी बोलतोय त्या दोन नावांना त्यांच्या सुंदर हस्ताक्षरामुळेच साऱ्यांनाच हेवा वाटावा असं भाग्य लाभलं.

होय. ही दोन माणसं भाग्यवंतच. याच सुंदर हस्ताक्षरामुळे एकांस इतिहासात साक्षात श्री शिवछत्रपतींचे चिटणीसपद आणि सहवासाचा लाभ जाहला. ती व्यक्ती म्हणजे साक्षात श्री. बाळाजी आवजी चिटणीस. हो. त्यांचं सुंदर हस्ताक्षर पाहूनच महाराजांनी त्यांना चिटणीस म्हणून नेमल्याचं वाचनात आलं होतं. आणि वर्तमानात एकांस शिवशाहीरांचे सचिव होण्याचं अहोभाग्य लाभलं.

होय, ही गोष्ट आहे पुण्यवंताची... ही गोष्ट आहे परिसस्पर्शाने आयुष्याचं सोनं झालेल्या एका भाग्यवंताची... गोष्ट एका सावलीची... होय, ही गोष्ट आहे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे गेली ५० वर्षे स्वीय सहायक/ सचिव असलेल्या श्री. राणाप्रताप प्रभाकर टिपरे उर्फ तुमच्या-आमच्या परिचयाच्या प्रतापकाकांची...

बाबासाहेबांना ओळखणाऱ्या मंडळींसाठी प्रतापराव टिपरे हे नाव खासच. हो. कारण बाबासाहेबांची भेट घ्यायची म्हटलं, की पहिला फोन प्रतापरावांना. प्रतापकाका म्हणजे सदैव हसतमुख असणारं व्यक्तिमत्त्व. कुणाला नाही म्हणणं यांना जमतच नाही. बरेच दिवस काकांविषयी लिहेन लिहेन म्हणताना आज तो योग जुळून आलाच.

१९६० सालापासून काका श्री. गो नी. दांडेकरांसोबत होते. त्यांच्या सोबतीने त्यांनी मावळातल्या बऱ्याच किल्ल्यांची भ्रमंती केली. १९६७ साल प्रतापकाकांच्या आयुष्यात आलं ते भाग्योदय घेऊनच. त्याआधी शाळा, घर, भाऊ-बहिणींच्या, मित्रांच्या गोतावळ्यात काका रममाण होते. काकांचं घर तळेगावला होतं, त्यावेळची ही गोष्ट. सह्य आणि दुर्गवेड्यांचं आदरस्थान म्हणजे प्रख्यात लेखक श्री. गो. नी. दांडेकर अर्थात गोनीदा (अप्पा) यांच्या घरात जाण्यासाठीचा जिना प्रतापकाकांच्या घरातून जायचा. त्यामुळे त्यांच्याकडे येणाजाणाऱ्या मोठमोठ्या व्यक्तींना पाहायला मिळत असे.

असेच एक दिवस श्रीमंत श्री. बाबासाहेब पुरंदरे अप्पांच्या घरी आले असताना त्यांच्याशी बोलण्याची संधी प्रतापकाकांना लाभली. काकांनी अप्पांसोबत गड-किल्ल्यांची बरीच भटकंती केली होती. अप्पांचे लेखनिक म्हणूनही काही काळ काका काम करीत असत. काकांनी लिहिलेलं अक्षर बाबासाहेबांनी एकदा पाहिलं आणि त्यांना काकांचं हस्ताक्षर अतिशय आवडलं. त्यांनी अप्पांना, त्यांच्या वडिलांना सांगितलं, ‘हा मुलगा मला द्या.’ तेव्हापासून अधूनमधून आणि त्यानंतर काही दिवसांनी काका पुण्याला बाबासाहेबांकडे जाऊ लागले आणि मग ते कधी बाबासाहेबमय झाले ते त्यांचं त्यांनाच कळलं नाही.

प्रतापकाका निरनिराळ्या कार्यक्रमांना, व्याख्यानाला बाबासाहेबांसोबत गावोगावी, तसंच किल्ल्यांवर सावलीसारखे राहू लागले. अवघा रंग एक झाला!

१९७४ साली शिवराज्याभिषेकाला ३०० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसृष्टी उभारण्यासाठी बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. त्या वेळी काका रात्रंदिवस बाबासाहेबांसोबत होते. त्यांची कल्पकता, त्यांच्या ठायी असणारी काम करण्याची ताकद, त्यांचा प्रेमळ स्वभाव याचा काकांवर फार मोठा प्रभाव पडला. काकांनी त्यांच्यासोबत अवघा महाराष्ट्र पादाक्रांत केला. लाल डब्याची एसटी ते स्वतःच्या गाडीतून, इतकंच काय तर अगदी परदेशवाऱ्यासुद्धा केल्या. अनेक राजवाडे, ऐतिहासिक वास्तू, घराणी बाबासाहेबांसोबत भटकंती करत असताना त्यांना पाहता आली. यातूनच पुढे जुन्या वस्तू जमवण्याचा छंद काकांना लागला. मोठमोठ्या व्यक्तींशी परिचय झाला. काकांच्या बाबासाहेबांसोबतच्या असंख्य आठवणी आहेत.

एकदा जाणता राजा महानाट्याचे प्रयोग सुरू असतानाच बाबासाहेबांची तब्येत अचानक बिघडली. काका नाटकात काम करीत होते. कुणाच्याही नकळत काका तिथून बाबासाहेबांना घेऊन बाहेर पडले आणि त्यांना दवाखान्यात दाखल केलं. तिथं ताबडतोब त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. काका तिथेच त्यांच्याजवळ बसून होते. बाबासाहेब काही वेळाने शुद्धीवर आले आणि त्यांनी हाक दिली ‘प्रताप.’ ती हाक ऐकताच काकांच्या डोळ्यातून अश्रूधाराच वाहू लागल्या.

बाबासाहेब त्यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला, अगदी पाळण्यातील मुलांनादेखील ‘अहोजाहो’च करतात; पण काही निवडक मंडळी आहेत ज्यांना बाबासाहेब एकेरी नावानेच हाक मारतात. प्रतापकाका त्यांच्यापैकी एक.

बाबासाहेब वेळेचे किती पक्के आहेत हे त्यांच्या बहुतांश निकटवर्तीयांना ठाऊक आहेच. अशीच एक आठवण. सांगलीत एका मोठ्या मैदानात बाबासाहेबांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं; मात्र प्रत्यक्षात व्याख्यानाच्या दिवशी तिथं खुर्च्या, टेबल, लाउडस्पीकर्स, प्रेक्षकांची बसण्याची सोय, दिवा यापैकी काहीही व्यवस्था नव्हती. संध्याकाळी सहाला दहा मिनिटं असताना बाबासाहेब व्याख्यानाच्या ठिकाणी जाऊन पोहोचले, तर शेंगा-चिवडा खाऊन टाकलेले कागद, प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्या, सिगारेटची थोटकं पडलेली दिसली. ते प्रतापकाकांना म्हणाले, ‘आपण ही घाण गोळा करून बाजूला करू आणि आपल्यापुरती तरी जागा स्वच्छ करून घेऊ.’ अगदी तसंच करून बरोबर सहाच्या ठोक्याला त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. समोर केवळ एकच श्रोता प्रतापकाका टिपरे. नंतर १०-१५ मिनिटांनी अन्य मंडळी आली; पण सगळी संख्या २०पेक्षा अधिक नव्हती.

बाबासाहेबांसोबतच्या प्रतापकाकांच्या आठवणी सांगायच्या म्हटलं, तर त्यावरही एक पुस्तक लिहिता येईल. असो. प्रतापकाकांना प्रख्यात लेखक, दुर्गवेडे श्री. गो. नी. दांडेकर आणि श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या सहवासात बरेच क्षण व्यतीत करता आले. या दोन्ही इतिहासवेड्या मंडळींची जडणघडण जवळून पाहता-अनुभवता आली. म्हणूनच मी त्यांना भाग्यवंत म्हणतो. या सावलीला (२०१७मध्ये) ५० वर्षं झाली, त्या निमित्ताने हा लेखनप्रपंच.

सावलीला स्वतःचं असं वेगळं अस्तित्व नसतंच.
सावलीने सदैव सोबत करायची असते.
सावलीने सोबतीचा सहवास अनुभवायचा असतो फक्त. सावली होणं सोपं नसतंच मुळात.

प्रतापकाका, आपणांस शिवशाहिरांची सावली होण्याचं भाग्य लाभलं. खरंच आपण भाग्यवंत आहात. असो. सध्यापुरतं इथेच थांबतो.

- चंदन विचारे, मुंबई

(माहिती संदर्भ : बेलभंडारा - सह्याद्री प्रकाशन, पुणे - डॉ. सागर देशपांडे. आणि श्री. राजेंद्रदादा टिपरे.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EVUXCS
Similar Posts
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला
समाजक्रांतीच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तीन जानेवारी ही युगस्त्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. हजारो वर्षे सामाजिक बंधनात अडकलेल्या स्त्रियांना ज्ञानाची कवाडे खुली करून देणाऱ्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, हजारो वर्षे सामाजिक गुलामगिरीत अडकलेल्या शूद्र व अतिशूद्रांचे कल्याण करणाऱ्या समाजक्रांतीच्या प्रणेत्या म्हणजे सावित्रीबाई फुले होत
गृहिणी-सखी-सचिव (उत्तरार्ध) परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षांनी पुरस्काराच्या वेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या
हाडाच्या कार्यकर्त्या, संवेदनशील लेखिका – दीपा देशमुख प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांचा २८ ऑक्टोबर हा जन्मदिन. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाच्या औचित्याने दीपाताईंची जिवाभावाची मैत्रीण डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ यांनी लिहिलेला, दीपाताईंची वाटचाल उलगडणारा लेख त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. कार्यक्रमाचा व्हिडिओही शेवटी दिला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language